
Cyclone Fengal Live : पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे हवामानात मोठा बदल झाला असून पुढील चार दिवस हा थंडीचा कडाका कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
पुणे शहराचे किमान तापमान 9.6 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे, तर परभणीमध्ये 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हे निच्चांकी तापमान नोंदवले आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक शहरांचे तापमान 8 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान खाली आले आहे, ज्यामुळे थंडीची लाट जाणवत आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 80 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या बदलाचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर जाणवतो आहे. थंडीमुळे सर्दी, पडसे, ताप, श्वसनविकार आणि सांधेदुखी यांसारखे आजार वाढू लागले आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपडे घालणे, आहारात गरम पदार्थांचा समावेश करणे आणि विशेषतः लहान मुलं व वृद्धांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण वाढणार असून नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
